Monday, September 17, 2012

छापलेल्या ओळींमधली न उमटलेली कहानी

डायरी पडली हातातून परवा ...
 बरोब्बर त्याच तारखेच्या पानाने का समोर आ वासून बघावे ?
त्या पानावर न एकच प्रश्नचिन्ह काढलेय मी मोठ्ठे. त्या प्रश्नचिन्हा ला दाढी काढलीय ....चेहरा पण काढलाय comedy आणि त्यालाच प्रश्न विचारलाय ......"अशी होते ओळख"?

 मला योगायोगांची आवड आणि तुझा कधीच विश्वास नव्हता .

 फ्रीज चे दार ही कलाकुसरीची आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य बजावायची माझी आवडती जागा ........

 एकदा एवढुशा sticky note वर बारीक बारीक गिचमिड अक्षरात मोठ्ठे प्रेम पत्र लिहिले होते तुला नी फ्रीज वर चिकटवून ठेवली होती .
 तू काय कमी हलकट होतास .... एवढे झकास लिहिलेले प्रेम पत्र वाचायची किती वाईट रीत .....काय तर म्हणे ,"जेंव्हा जेंव्हा फ्रीज उघडायला जाईन , तेंव्हा तेंव्हा एक एक ओळ वाचतो"  आणि मग मधेच चार पाच दिवसांनी एक पिंक टाकायची ..."इतके कशाला भारंभार लिहून ठेवायचे असते तुला"?

 दोन आठवड्यांनी म्हणजे मी नेमके काय लिहिले होते त्यात ते विसरून काही काळ लोटल्यावर एकदा त्या दारा समोर बसवून , लाल पेनाने चुका अधोरेखित करत काय म्हणलास तर ,"शुद्धलेखन सुधार ...बाकी छान लिहीलायेस" .... मी उत्तर ऐकून गार पडल्यावर मुटकुळे उचलून माझे टाकून आलास बेडरूम मध्ये ....

 दुसऱ्या दिवशी उठले , सकाळी उठल्यावर तू नसायची सवय मला मागल्या जन्मापासून आहेच .......

 कॉफी साठी दुध घ्यायला म्हणून फ्रीज चे दार उघडले तर त्यावर एक कोरी sticky note लावलेलीस...तळाशी एकच स्पष्ट वाक्य ....."पुढचे कधी लिहितेस" ?

 मग पुढे चार दिवस फ्रीज च्या दरवाज्याने 'निरोप्याची ' भूमिका पार पडलीन .. माझी full on नौटंकी .....गाणे च काय लिहिले , कधी फिल्म चे dialogues ,कधी 'आज तू माझा जरा नावडता झाला आहेस " असले काहीही गाढव .

 पण मी किती भसा भसा लिहिले तर तुझी उत्तरे अशीच थेट नी एका वाक्यातली ... तुझे असणे ही एका वाक्यातले सोपे,........." मी आहे " आणि नसणे ही एका वाक्यातले ,............. "मी नाहीये " त्या दोन वाक्यां मधले अंतर आवाज नी प्रकाशाचा वेग अशा परिमाणा मध्ये बसवता नाही आलेले ....पण वीज चमकली तरी भीती वाटत नाही तू गेल्या पासून नी ढग गडगडल्या चे अप्रूप वाटत नाही .पावसा बद्दल नकोच काही बोलायला

.सुरवातीच्या माझे काही अडत नाही नी मला तसे तुझ्या बद्दल काहीच वाटत नाही असा माझा अविर्भाव असलेल्या आपल्या भेटी गाठी ...आणि मग ६ व्यांदा भेटलो तेंव्हा आपण कोसळणाऱ्या शेअर मार्केट बद्दल बोलत होतो , वेटर ला कॉफी आण असे सांगता सांगता मधेच माझ्या कडे एक टक बघत म्हणलास ,"आत्ता विचार कर ....आणि थांब तिथेच ..म्हणजे मग पुढचे सव्वा वर्षाचे प्यार , त्याच्या पुढचे साडे तेरा आठवडे पश्चात्ताप , पुढचे अडीच महिने तिरस्कार , त्याच्या पुढचा आठवडा स्वतःची कीव करणे , चीड चीड वगेरे आणि मग २३ दिवसांनी back to normal life हे सगळे टाळता येऊ शकेल तुला ....

तुला कायम सगळे माहिती असण्याचा छंद आणि मला न माहिती असण्याची आवड ...तसे तुझे गणित चुकले ...पण अर्थ नाही बदललेला तुझ्या हिशोबाचा .. .

 अगदीच कधीतरी तुझे कुलूप फोडून आत प्रवेश मिळवता आला मला ...नेहमी जगाला घाबरून तुला बिलगायचे मी पण एकदा कधीतरी तू तशी घाबरलेली लहान मुलाची मिठी मारलेलीस मला नी तसाच हात धरून ठेवलेलास ....

 पण ते एक गिने चुने लम्हे सोडले तर तुझा ताबा कधी सुटला नाही नी मला एकदा तो तुझ्या कडे दिल्यावर मिळवता आला नाही ...

 आता एक pattern झालाय ... तूला आठवायचं नाही असे ठरवण्यात दमते आणि झोपते . नाहीतर तू लक्कन आठवलास रस्त्यात मधेच सगळे क्षण हमला करतात , मग मी हमसा हमशी रडते आणि झोपते .

 मध्ये एक वेगळी डायरी विकत आणली शहाणे व्हायचे ठरवून आणि ज्या ज्या दिवसांवर तुझी छाप आहे ते ते खोडून दुसरे च काहीतरी वेगळे खोटे fictional आणि सोपे सुटसुटीत लिहावे असा विचार केला तर सगळेच दिवस तुझे ....

 आता मीच नवी आणायला झालेय ! आपली कहानी कागदा वर लिहिली खूप पण काही केल्या उमटेना ...

 सगळ्या पेंसिलींची धार गेलेली आणि सगळे sharpeners बोथट झालेले ..

 हातात खोडरबर आहे उरलेला फक्त .. बघते न उमटलेली कहानी खोडता येतेय का ते .........!

1 comment:

cv said...

chhan.....kadambari madhala ekhad pan wachava asa watala......:)