Monday, June 27, 2011

न सांगता

न सांगता




लहानपणी तुला सारखी लागायचे मी
जरा लक्ष दिले नाही कि गाल फुगवून बसायचे , नेहमीची नाटके
डोळ्यातून हे एवढे पाणी काढायचास मोठ्याने रडत , नि मी सगळे टाकून आले नी उचलून घेतले कि पुढच्या क्षणी खी खी करून दाखवायचं
धोशा लावायचास गोष्ट सांग , गोष्ट सांग .....
आता कधीतरी मला मोह होतो म्हणायचा , मला सांग कि गोष्ट .....
पण मला नाही न तुझ्यासारखा फतकल मारून जमिनीवर बसून हट्ट करायला scope ....
मी कायमच मोठ्ठी होते न तुझ्याहून
पण आता तू ही झालायस की....
मी न करता माझे हट्ट पुरवायचे कसे सुचत नाही रे

लहानपणी शाळेत रोज काय काय झाले हे रोज रोज मला पुढ्यात बसवून सांगायचास
नी जगातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असल्यासारखे मी ऐकायचे सगळे
कोणी मारले , कोणी वर्गात मस्ती केली , बाई कशा ओरडतात नी त्रास देतात
नी काय तुझा तो homework घेताना मला वाटायचे की देवा , हा पटकन मोठ्ठा होऊन जाऊदे ....
खरेच झालास
पटकन मोठा नी आता वाटते ,चालले असते जरा अजून हळूहळू गेला असता वेळ तर
आता खरेच महत्त्वाच्या गोष्टीही तुझ्या मला माहित नसतात
तू घरात असलास तर बाहेर फक्त तुझे बूट किंवा चपला दिसतात

लहानपणी आपण पत्त्याचा बंगला करण्यापासून , लपाछपी, राम लक्ष्मण सीता सगळे खेळलोय
मला तर तुझ्या बाबाने वेड्यात काढलेले ...
नी एकदा तू अक्खा दिवस भर कपाटात लपून बसलेलास
मला होते माहित
पण तुझा 'कस्सं हरवले' चा आनंद हवा होता मला भरभरून ......
रात्री मग बाबाने त्याचे शर्ट बघायला कपाट उघडले नी तुला त्यात मांडी घालून बसलेले बघून साष्टांग नमस्कार केला
तू ही वर seriously आशीर्वाद दिला होतास नी आम्ही सगळे हसत बसलो होतो


लहानपणी इतका आईवेडा होतास ...
तुझी आज्जी म्हणायची ..मोठे पणी बिलकुल तुझ्या वाटणीला यायचा नाही
मी
फुशारून म्हणायचे नाहीच मुळी....
पण आज्जी शहाणी होती , नी माझ्याहून पाहिलेले पावसाळे ही जास्त
शिवाय तुझ्या बाबाचा प्रवास तिच्या डोळ्यासमोर ताजा असणार
सापडेनासा होतोस जेव्हा तेंव्हा वाटते आजी हवी होती तुझी
'तुम्ही म्हणलात', म्हणून झाले असे , असा वाद घातला असता
नी हळूच समजूतदार पणे हसलो असतो दोघी

लहानपणी तुझे
, माझे इतके फोटो होते
काही झाले कि तू म्हणायचास 'बब्बू फोतो'
नी तुझ्या बब्बुला हौस ही दांडगी
तू माझा make up थापल्यानंतरच्या वेळचे अक्खे फोटो सेशन आहे समोर पडलेले
कोणी आले की तुझे फोटो पाहिल्याशिवाय नी running commentory ऐकवल्याशिवाय जाऊ द्यायचा नाहीस
तुझे
फेसबुक वर असतात तुझे फोटो
पण माणसे बदललेली
मी आपले हे जुने फोटो काढून हसत बसते एकटीच

बायकांचे होत असणार हे बहुतेक असे
कारण तुझ्या बाबाला महिन्यातून मधेच एखाद वेळी आठवते ,'चिरंजीव आहेत कुठे'?
मग तुम्ही एक काय त्या long drive ला जाऊन आलात गप्पा मारून की direct पुढचा महिना
मग मलाच 'अस की जरा घरी', असा हट्ट कसा करावा हे कळत नाही
बाबाचा मित्र वगेरे नंतर झालाय
त्याच्या किती complaints केल्या आहेस माझ्याकडे
आपली गट्टी किती जुनी ए रे कार्ट्या.......

लहानपणी promise केले होतेस की सगळे सगळे येऊन सांगशील मला
आताशा येऊन सांगतोस ते निर्णय असतात
ज्यावर मी हसून, छान असे म्हणायचे असते
आईने समजूतदार असले पाहिजे हा नियम ज्याने केला असेल त्याला अंगठे धरून उन्हात उभे केले पाहिजे
मला कशी कळायची तुला रात्री ३ ला भूक लागलेली
तसे तुला ही मी न सांगता माझे हट्ट कळायला पाहिजेत

2 comments:

ओहित म्हणे said...

"तू घरात असलास तर बाहेर फक्त तुझे बूट किंवा चपला दिसतात"

"मला कशी कळायची तुला रात्री ३ ला भूक लागलेली"

he class hote!!

a Sane man said...

सुंदर. चटका लागला वाचताना.