Monday, September 17, 2012

भिंती पलीकडची शाळा

'....आणि काय काय करता गं मग तुम्ही '?वर एक मुलगी मोठ्य्याने 'मलमखाम' असं म्हणली .आम्ही हसलो सगळे खूप आणि ती ही हसली . खूप साऱ्या काळ्याभोर हसऱ्या डोळ्यांच्या सावळ्या मुलींच्या शाळेत जाऊन आले आज .
 माझं खरं तर ,जगाचं 'आपापली शाळा ' ह्या विषयावर जसं प्रेम असतं तसं कधीच नव्हतं ,पण 'मधली सुट्टी' च्या निमित्तानं खूप वेगवगेळ्या शाळांच्या मुलांबरोबर त्यांच्या त्यांच्या बेंचेस वर बसून गप्पा मारता आल्या , त्यांची सिक्रेट्स ऐकायला मिळाली , त्यांचे amazing निबंध वाचायला मिळाले , त्यांची मला बंद पडणारी बडबड ऐकायला मिळाली .शहरातल्या शाळा , गावाकडच्या शाळा , प्रायोगिक तत्वावर सुरु असलेल्या शाळांचा रिसर्च ह्या निमित्तानं बघता बघता शाळेच्या आतल्या नी पुस्तकांबाहेर च्या च्या वेगळ्या जगाशी ओळख झाली
महाराष्ट्र शासनाच्या नव्या नियमानुसार दर १ किलोमीटर च्या अंतरावर एक शाळा असायला हवी ...रस्त्यांवरून जाताना आपल्याला ' वाहने सावकाश हाका , पुढे शाळा आहे ' चे बोर्ड सर्रास दिसतात .त्यामुळे शाळा नक्की आहेत भले २६५३ कमी का असतील .पण रस्त्यांवरून जाताना आपल्याला अनेक ठिकाणी बांधकाम सुरु असलेलं दिसतं ..तिथे अनेक लहान मुलं मुली आपापल्या आई बाबांसोबत आलेली असतात .त्यातली काही तर कदाचित शाळा ही बांधत असतील ....त्यांच्या शाळेचं काय ? ती त्यांच्या आईबाबांसोबत वीट भट्ट्या जिथे लागतात तिथे , उस तोडले जातात तिथे जातात . त्यांच्यासाठी शाळा आहेत त्यांच्या गावात पण त्या रिकाम्या ....ओस पडलेल्या ! कागदोपत्री दर एक किलोमीटर अंतरावर शाळा उभ्या राहतात . आपल्याला ऐश्वर्याच्या मुलीचं बारसं ,मंत्रालयाला आग , इशा देओल चे संगीत वगेरे बातम्या माहित असतात .सिग्नल ला पुस्तकं विकणारी मुलांना 'शाळा' असेल का वगेरे प्रश्न आपल्याला सुचतच नाहीत .सुचेपर्यंत सिग्नल ग्रीन होतो .

 जिथे पालकांसाठी त्यांच्या मुलांनी शिकणं ही गरज च नाहीये , जिथे मुलीला शिकवून करायचेय काय ..ती जाणार दुसऱ्याच्या च घरी त्यापेक्षा धाकट्या भावाला सांभाळेल तरी असा दृष्टीकोन आहे त्या देशात प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मुलभूत अधिकार आहे खरा पण त्याचं करायचं काय ? हातावर पोट असलेले वारली , कातकरी समाजाचे लोक खुपदा मजुरीचे काम करायला आपलं गाव सोडून वर्षाचे काही महिने वेगवेगळ्या शहरात , गावात जातात जिथे काम असेल तिथे ,त्यातले काही आता त्यांच्या मुलीना एका शाळेत जाऊ द्यायचं ठरवतात आदिवासी आणि वीट भट्टी कामगारांच्या मुलीन्साठीची ही शाळा आहे वसई जवळ च्या उसगाव भागात .

 "माझ्या मोठ्या बहिणीला शाळा सोडावी लागली , आणि धाकट्या भावाला सांभाळायला लागलं .माझ्या आईला मी झाले तेंव्हा तिला आजी ओरडली . आजीला मी आवडत नव्हते .पण मग मला आई बाबांनी ह्या शाळेत घातलं नी नंतर आजीला कळलं मी हुशार आहे ते .आता नही ती मला ओरडत .मी पण शिकून ह्याच शाळेत शिकवायला येणार".... . असं सांगणारी एक मुलगी . उद्या ती खरंच शाळेत येईल का शिकवायला वगेरे हे प्रश्नच महत्वाचे नाहीत .मुळात इथपर्यंत पोचायला तिला करायला लागलेली कसरत च आपल्या गावी नसते , आपल्या ओळखीची नसते .आपले कसे पोट भरल्या नंतरचे complicated प्रश्न ...त्यांचा प्राथमिक आहे syllabus अजून . कृपया तुमच्या मुलीना आमच्या शाळेत येऊ द्या असे पालकांना समजवावे लागतं ...नी गेल्या काही वर्षांच्या सतत च्या पाठ पुरवणी नंतर आता शाळेनं बारसं धरलेय .

 तरी मग एखाद्या मुलीच्या घरून दोन तीन महिन्यांनी आई , भाऊ भेटायला आले की मुली रडून रान उठवतात .खूप मुलीनी तर त्या कशा वेगवगेळ्या प्रकारे पळून गेल्या , मग कसं त्यांना परत आणलं हे ही मला एकदम छानपैकी सांगितलं .कसे ही असलं तरी आपल्या आजू बाजूच्या माणसातून , घरच्यामधून उठून कुठेतरी एका जागी येऊन रहायचं आणि वर ते 'अभ्यास शिकवणार' पण ..कसं आवडणार? ....

पण काही महिने जातात नी मग हळूहळू त्यांची मुळं इथे रुजायला लागतात . चार भिंतींच्या पलीकडच्या ह्या शाळेत शिकवलं काय जातं ह्या चं मला काही पडलेलं नाही कारण मला शाळेच्या गणवेशात , इकडे तिकडे फिरत रमणाऱ्या , घसरगुंडी ला सर्कुंडी म्हणत , कोंबडी नी पिंजरा खेळणाऱ्या , एक क्षण ही न कंटाळलेल्या मुली भेटल्या .

 त्यातल्या एका रेणुका ला 'करीना' व्हायचं आहे... एका जयश्री नं ९ व्या वर्षी शाळेत प्रवेश घेऊन एका वर्षात दोन दोन इयत्ता दिल्यात नी आता ती दहावीत आहे . एक पूजा पहिली पासून इथे आहे नी आता १२ वी ला सकाळ ची ५ ची बस घेऊन ती तासभर लांब असलेल्या एका collage मध्ये पुढचे शिकतेय . जिना उतरताना एक मुलगी एकटीच वर्गात बसून हार्मोनियम वर हात फिरवताना दिसली . एकीला अजिबात आवडत नाही अभ्यास करायला पण तिला fashion designer व्हायचेय म्हणून मग आता शिकायला पाहिजे ..... इथेच मोठ्या झालेल्या मुलींच्या डोळ्यात जबाबदारी ची जाणीव दिसते ..त्यांच्या नंतर आलेल्या कच्च्या बच्च्यांना सांभाळत ह्या ताया शाळा सांभाळतात त्यांच्या शिक्षकांच्या मदतीनं . एक परिणीता होती बुजलेली नुकतीच आलेली ....पण पुढच्या वेळी जाईन मी तोवर ती रमलेली असणारे ..मला खात्री ए

... बाहेर पडल्यावर ह्या आदिवासी मुलींचे प्रश्न सोपे नाहीच होणारेत ..उलट आदिवासी समाजात त्यांना लग्नासाठी त्यांच्या योग्य मुलं कशी मिळणार ?पुढे दहावी नंतर ह्या शाळेच्या सोप्या वातावरणा तून बाहेर पडून collage मध्ये कशा सामावल्या जाणार ?तिथले संस्थापक म्हणले .."दारू न पिणारा नवरा मिळाला तरी खूप ...म्हणून मग मी त्यांना कराटे शिकवतो , निदान स्वतःचे संरक्षण तरी करू शकल्या पाहिजेत ".

 मजा आली त्यांच्या बरोबर खेळून , त्यांची गाणी ऐकून , 'तु सगल्या हिरोला भेटला काय' असे वेगळं मराठी ऐकून ....मी निघताना म्हटलं....मी येईन परत .. त्यावर लग्गेच प्रश्न आला .....'कधी'?

 तशी लाज अधे मध्ये वाटावी आपल्या असण्याची असे अनेक प्रसंग आले तरी अशी एखादी शाळा ,आपली दुक्खं मुर्ख आहेत नी त्यावर रडण्या बिडण्याचा गाढवपणा वगेरे करायचा नसतो असे जाणवून देते ... मला कधी शाळा नाही आवडली पण ह्या शाळेत मात्र मला जायला खूप आवडेल .....

 [ वसई जवळची वज्रेश्वरी इथली उसगावातली ही शाळा आदिवासी मुलीना शिक्षण देते , त्यांचं राहणं , खाणं , पिणं , पुस्तकं , गणवेश , छंद , संगणक सगळा खर्च शाळेचे संस्थापक funds मधून करतात , कोणाला काही करावेसे वाटले , शाळेत जावसं वाटलं, ,मुलीना गोष्टी सांगाव्या वाटल्या , तिथे जाऊन त्यांच्या बरोबर कधी रहावसं वाटलं , खेळावं वाटलं तर ' स्वतःसाठी ' म्हणून जरूर जा ...मुली तुमचं नक्की हसून स्वागत करतील ]

No comments: